Monday, November 12, 2007

आधारवेल ~ 3

आधारवेल ~ 3

मला कळे कळे तो तिने मला व्यापून टाकले
व्यापून टाकला माझा विशाल विस्तार- फांदीफांदीनं जपून वाढवलेला.
तिने नुसतं मलाच नाही तर माझं सारं विश्व व्यापून टाकलं.

मी होतो तिच्या अस्तित्वाचा आधार अन
ती अस्तित्व माझ्या अस्मितेचं.

तिने डोळे उघडले की सूर्य उगवायचा.
ती थकली, दमली की रात्र यायची पाय न वाजवता, चंदेरी दुलई घेऊन.
ती लाजली की लाली अवतरायची नभाच्या गालावर.
ती गुणगुणू लागली की ताल धरायचा झरा खळाळणारा
अन
वाराही नाचायचा फुलपाखरांबरोबर फेर धरून.
ती रागावली की सारं आभाळ जणू भरून यायचं तिच्या नजरेत.
कसं अगदी दाटून यायचं.
आणि अचानक रिमझिम रिमझिम बरसू लागायचं.
तिचा एक मुका अश्रू सारं सारं सांगून जायचा अगदी सारं काही.
जे सांगायला नभाने कोण अटापीटा करावा -
आदळआपट,
विजांचा कडकडाट,
ढगांचा गडगडाट
आणि वर ओतू गेल्यागत कोसळणं.

पण तिला पाऊस आवडायचा,
खूप खूप आवडायचा.
तिची चटकन कळी खुलायची.
मग ती चिंब भिजायची सरसरणाऱ्या सरींमधे.
विरघळून जायचं तिचं मन पावसाच्या थेंबात
आणि मग मुग्ध अन मुक्त होऊन ती थरथरत राहायची
हारवून जायची वातावरणात.
अशा वेळी कितीतरी दूर पोहोचलेली असायची ती.
तिच्या पासून दुरावण्याची एक तीव्र कळ उठायची ह्रदयात.
नुसत्या त्या विचारांनीच सरसरून काटा यायचा अंगावर.

पण दुसऱ्याच क्षणी
ती तिचं मस्तक माझ्या छातीवर घुसळायची.
ठिबकणारे थेंब पानात झेलून ते माझ्या अंगावर उडवण्यात तिला भारी मौज वाटायची.
होणाऱ्या गुदगुल्यांमुळे मी खदखदून हासायचो.
मग माझ्या फांदीपानांवरलं पाणी पावसासारखं बरसायचं.
आणि आधीच पावसात चिंब भिजलेली ती
मीच तिला भिजवलं म्हणून माझ्यावर रागवायची.
अगदी खोटं खोटं!

- By प्रसाद
[http://prasadik.blogspot.com/]

No comments: