Friday, August 10, 2007

जितेंद्र अभिषेकी - माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे, गाणे
व्यथा असो, आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो, अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे

कधी ऐकतो गीत झर्‍यांतुन
वंशवनाच्या कधी मनांतुन
कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन
झुळझुळताती तराणे

गा विहगांनो माझ्यासंगे
स्वरांवरि हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन
उसळे प्रेम दिवाणे

लता मंगेशकर - भय इथले संपत नाही (महाश्वेता)

भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकवीली गीते

हे झरे चंद्र सजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल
जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इन्द्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे

सुधीर फडके - तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

नीरवता ती तशीच, धूंद तेच चांदणे
छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न असता उरात, स्वन ते न लोचनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरातुनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी

सुधीर फडके - विठ्ठला, तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार

घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार

तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार

सुधीर फडके - देव देव्हार्‍यात नाही

देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मुठीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही

देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही

सुधीर फडके - तुझे गीत गाण्यासाठी

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे

शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा
रानफुलें लेऊन सजल्या, या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी, मला जाऊ दे रे

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झर्‍यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारें
तुझे प्रेम घेऊन येती गंध धूंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या, तुला वाहू दे रे

पं. भीमसेन जोशी - माझे माहेर पंढरी

माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी

बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...

पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...

माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण

आशा भोसले - मागे उभा मंगेश

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे

जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे

जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे

आशा भोसले - केव्हा तरी पहाटे

केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा, फसवून रात गेली

कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा, निसटून रात गेली

उरले उरात काही, आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे, उचलून रात गेली

स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती
मग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली

आशा भोसले - जिवलगा, राहिले रे दूर घर माझे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोवती दाटून येई
सुख सुमनांची सरली माया पाचोळा वाजे

गाव मागचा मागे पडला
पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे

निराधार मी, मी वनवासी
घेशील केव्हा मज हृदयासी
तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे

आशा भोसले - चांदणे शिंपीत जाशी

चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफूले

वाहती आकाशगंगा, की कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी, तार पदरा गुंफीले

गुंतविले जीव हे, मंदीर ही पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले

गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी
पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे

आशा भोसले - तरुण आहे रात्र अजूनि

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे

सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे

बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे

उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे

अरुण दाते - डोळ्यांत सांजवेळी

डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू, माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या, शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही, दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या, ही झाकिली विराणी

अरुण दाते - जेव्हा तिची नि माझी

जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली
झाली फूले कळ्यांची, झाडे भरात आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन पालखी निघाली

केसांतल्या जुईचा तिमिरास गंध होता
श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता
वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली

नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे
स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे
ओथंबला फुलांनी अवकाश भवताली

अरुण दाते - स्वरगंगेच्या काठावरती

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला

वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न तरी मी ती प्रिती
चैतन्याचा ऊर तेधवा गंगेला पातला
स्वरगंगेच्या काठावरती ...

अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठून मिलन
जीव भुकेला हा तुज वाचून
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला
स्वरगंगेच्या काठावरती ...

अरुण दाते - शुक्रतारा, मंदवारा

शुक्रतारा, मंदवारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा

मी कशी शब्दात सांगू, भावना माझ्या तुला
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा

लाजर्‍या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा

शोधिले स्वप्नात मी ते, ये करी जागेपणी
दाटूनि आलास तू रे, आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा

अरुण दाते - या जन्मावर, या जगण्यावर

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी
इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे

हृदयनाथ मंगेशकर - ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

हृदयनाथ मंगेशकर - तू तेव्हा तशी

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी
तू बहराच्या, बाहूंची

तू ऐलराधा, तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू नवी जुनी, तू कधी कुणी
खारीच्या गं डोळयांची

तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची
तू खट्टी मिठ्ठी ओठांची

संदीप खरे - आताशा मी फक्त रकाने

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खर्डून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठलाही अन्‌ ताप नको आहे
उत्तर कुठले मूळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छ्ळावे त्यानां, त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता ऊंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुश गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो

कळून येता जगण्याची या इवलिशी त्रिज्या
ऊडून जाती अत्तरापरी जगण्याच्य मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदॆव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो

संदीप खरे - मी हजार चिंतानी

मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजावतो

मी जुनाट दारापरी कीरकीरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझिया सूर्याहून संताप
दिसतात त्वचेवर राप ऊन्हाचे शाप
तो त्याच ऊन्हाचे झगझगीत लखलखते
घडवून दागिने सूर्यफूलांवर झुलतो

मी पायी रुतल्या काचंवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवत लाच लावतो बोली
तो मूळात येतो इछा अर्पून साऱ्या
अन्‌ धन्यवाद देवाचे घेउन जातो

मज अध्यत्माचा रोज नवा श्रुंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीहि
त्या शाम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो

मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजावतो

संदीप खरे - मन तळ्‌यात मळ्‌यात

मन तळ्‌यात मळ्‌यात
जाईच्या कळ्‌यात

मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्‌यात

ऊरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी कशात

इथे वाऱ्याला सांगत गाणी
माझे राणी
आणि झुळुक तुझ्या मनात

भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कर नभात

माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्‌यात...

संदीप खरे - एवढंच ना .. एकटे जगू

आमचं हसं आमचं रडं
ठेवून समोर एकटेच बघू
एवढंच ना ...

रात्रीला कोण दुपारला कोण
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण
श्वासाला श्वास क्षणाला क्षण
दिवसाला दिवस जोडत जगू
एवढंच ना ...

अंगणाला कुंपण होतच कधी
घराला अंगण होतंच कधी
घराचे भास अंगणाचे भास
कुंपणाचे भासच भोगत जगू
एवढंच ना ...

आलात तर आलात तुमचेच पाय
गेलात तर गेलात कुणाला काय
स्वतःच पाय स्वतःच वाट
स्वतःच सोबत हॊऊन जगू
एवढंच ना ...

मातीचं घर मातीचं दार
ह्य मातीच घर मातीच दार हृ
मातीच्या देहाला मातीचे वार
मातीच खरी, मातीच बर
मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना ...

संदीप खरे - दिवस असे की

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कुणाचा नाही...

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही
दिवस असे की...

प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्‌याला लगाम शोधीत आहे
परि मजला गवसत नाही
दिवस असे की...

मी तुसडा की मी भगवा बैरागी
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी
अस्तित्वाला हजार नावे देतो
परि नाव ठेववत नाही
दिवस असे की...

’मम’ म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कुणाचा नाही...

संदीप खरे - तुझ्या-माझ्या सवे

तुझ्या-माझ्या सवे कधी गायचा पाउसही
तुला बोलावता पोचायचा पाउसही

पडे ना पापणी पाहुन ओले मी तुला
कसा होता नी नव्हता व्हायचा पाउसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाउसही

मला पाहुन ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला शिकवायचा पाउसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाउसही

आता शब्दांवरी फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाउसही

संदीप खरे - कितीक हळवे, कितीक सुंदर

कितीक हळवे कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्यानंतर

अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्‍वासांनी थांबुन जावे
परस्परांना त्रास, तरीही
परस्परांविण ना गत्यंतर

मला पाहुनी दडते-लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलांस माझ्या
लावून जाते हळूच अत्तर

भेट जरी ना या जन्मातून
ओळख झाली इतुकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही
त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मी-पण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌
तू ही मजला सावर सावर

प्रेम कधी हे भरुन येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप
अन्‌ इकडे ही शाई झरझर

संदीप खरे - सरीवर सर ...

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फिरे वारा
मेघियाच्या ऒंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
ऒल्या ऒल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फिटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ऒले रान रान नव्हे मन तुझे
जशी ऒली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर

संदीप खरे - कसे सरतील सये

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ऒठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ऒले
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फ़ुलं दोन ...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया आबोलीची फ़ुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना

गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना?